मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नऊ महिन्यांपूर्वी करोनाने मृत्यू झाला म्हणून गुप्ता कुटुंबियांनी आपल्या कुटुंबातील एका सदस्यावर अंत्यसंस्कार केले. आता या कुटुंबाचे दुःख निवळत असतांनाच रुग्णालयाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत गुप्ता कुटुंबियांना त्यांचा मृत सदस्य जिवंत असल्याचे दिसले. त्यामुळे आता गुप्ता कुटुंबियांनी या प्रकरणी रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामसरण गुप्ता हे मुंबईच्या चेंबूर परिसरात राहत होते. रामसरण गुप्ता यांना 24 जून २०२० ला कोरोनाची लागण झाली. त्यांना वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र 29 जूनला त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला. त्यानंतर गुप्ता कुटुंबियांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
यानंतर काही दिवसांपूर्वी भाभा रुग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत काही रुग्ण दिसत आहेत. त्यात दिसणारा एक रुग्ण हे दुसरे तिसरे कुणी नसून रामसरण गुप्ता असल्याचे दावा त्यांच्या मुलीने केला आहे. तसेच जर ते जिवंत होते, तर मग ते आता कुठे आहेत? आणि मग आम्ही वडील समजून ज्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, ते कोण होते? असा सवाल गुप्ता कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.
या रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गुप्ता कुटुंबाने केले आहे. याबाबत कुटुंबियांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे आता रामसरण गुप्ता कुठे आहेत? यामुळे आता पोलिसांसमोर रामसरण गुप्ता यांना शोधण्याचे मोठे आव्हान समोर आले आहे.






