मुंबई : अंधेरी आणि जोगेश्वरीला मिळणार आणखी दोन कोव्हीड समर्पित सुविधा

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – बीएमसीने मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंधेरी-जोगेश्वरी आणि विलेपार्ले ही दोन ठिकाणे कोव्हीड सुविधा स्थापित करण्यासाठी निवडली आहेत.

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या के वेस्ट वॉर्डमधील अंधेरी आणि जोगेश्वरी यांना आणखी दोन कोव्हीड समर्पित सुविधा मिळणार, ज्यामध्ये २६० बेड असून त्यापैकी १३० बेड्सला ऑक्सिजनचा आधार आहे. बीएमसीने अंधेरी-जोगेश्वरी आणि विलेपार्ले ही दोन ठिकाणे मेच्या पहिल्या आठवड्यात स्थापित करण्यासाठी निवडली आहेत. सध्या वॉर्डात ३० हून अधिक कोविड-१९ समर्पित सुविधा आहेत व दररोज सुमारे ६०० प्रकरणे नोंदविली जात आहेत.

नगरपालिका मार्केट इमारत आणि एक कम्युनिटी सेंटरचे रूपांतर कोव्हीड सेंटरमध्ये केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहाय्यक मनपा आयुक्त विश्वास मोटे म्हणाले, “आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात या सुविधा तयार होण्याची अपेक्षा आहे.”अंधेरी पश्चिमचे भाजपचे आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि मोटे यांना या प्रभागासाठी समर्पित सुविधा मिळावी म्हणून पत्र पाठविल्यानंतर सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडला असलेल्या कम्युनिटी सेंटर मध्ये १५० बेडची सुविधा तर जोगेश्वरी पश्चिममधील कॅप्टन सावंत रोडवर असलेल्या मार्केट बिल्डिंग मध्ये ११० बेडची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. कम्युनिटी सेंटर आणि मार्केट बिल्डिंग सुविधांमध्ये अनुक्रमे 75 आणि 55 ऑक्सिजन बेड असतील. “केंद्रे चालविण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या संकल्पनेचे पालन करणाऱ्या कंपन्यांची आम्ही मदतही घेत आहोत,” मोटे म्हणाले. प्रभागातील रुग्णवाढ होण्यामागील कारणांबद्दल विचारले असता ते पुढे म्हणाले, “यामागील एक कारण म्हणजे लोक कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत नाहीत.”

“बेड्सची कमतरता आहे, विशेषत: आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन. मला दररोज हॉस्पिटलच्या बेड्स उपलब्धतेची माहिती मिळते आणि ती शून्य असते. आपल्याला लवकरात लवकर अशा सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मी अधिकाऱ्यांना कामाची गती वाढविण्याची विनंती केली आहे आणि आवश्यक ते सर्व सहकार्यही केले जाईल”, असे साटम म्हणाले.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार २१ एप्रिल रोजी शहरात फक्त १५ व्हेंटिलेटर आणि ५१ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. आकडेवारीनुसार ८२४ ऑक्सिजन बेड रिक्त आहेत, परंतु टंचाईचा परिणाम रुग्णालयांच्या नियमित पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील २४ वॉर्डपैकी के वेस्ट वॉर्डमध्ये २० एप्रिलपर्यंत सर्वाधिक ४२,६८६ कोरोनाबाधित रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या देखील जास्त असून ती ६,९४९ इतकी आहे. 21 एप्रिल रोजी मुंबईत एकूण ८३,९३४ सक्रिय रुग्णसंख्या होती. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, के पश्चिम प्रभागातील अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्लेमध्ये सर्वाधिक ३०२ सीलबंद इमारती किंवा मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here