नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याची बातमी बुलंद पोलीस टाइम्सतर्फे प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीने नंदुरबार जिल्ह्यातील खासगी कोविड सेंटरमध्ये खळबळ माजली होती. या बातमीची दखल घेत रुग्णांकडून अवाजवी देयक आकारल्याने शहादा येथील धन्वंतरी रुग्णालयाला देण्यात आलेली कोविड हॉस्पिटलची मान्यता जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी रद्द केली आहे.
जिल्ह्यात कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याने आपत्कालिन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सदर रुग्णालयांनी रुग्णाकडून वाजवी दर आकारावे यासाठी हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवण्यासाठी व तपास करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार समन्वय अधिकाऱ्यांनी गुरुवारी खाजगी रुग्णालयाची तपासणी केली व धन्वंतरी रुग्णालयाने अवाजवी दर आकारल्याचा अहवाल सादर केला.
या अहवालानुसार सदर रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. घटना व्यवस्थापक, तहसिलदार, पोलीस निरीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सदर हॉस्पिटल सील करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. प्राधिकृत केलेल्या यंत्रणेने हॉस्पिटलमध्ये अलगीकरणात असलेल्या रुग्णांना इतर कोविड रुग्णालयात दाखल करावे व धन्वंतरी हॉस्पिटलकडून सदर रुग्णांचे त्याबाबतचे कोणतेही देयक आकारण्यात येऊ नये.
हॉस्पिटलमधील रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल करताना त्यांची गैरसोय होणार नाही आणि त्यांच्या उपचारात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तोपर्यंत धन्वंतरी रुग्णालयातच रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. याबाबत घटना व्यवस्थापकांनी दक्षता घ्यावी. घटना व्यवस्थापकांनी अतिगंभीर रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार इतरत्र दाखल करावे अथवा धन्वंतरी रुग्णालयातच उपचार पूर्ण होईपर्यंत ठेवण्यात यावे. सदर रुग्णांची नियमित तपासणी व उपचार पद्धती सुरू ठेवण्यात यावी.
आदेशानंतर सदर रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करू नये. रुग्णालयाची बीलबाबतची कागदपत्रे घटना व्यवस्थापकांनी ताब्यात घ्यावीत व तपासणी करावी. रुग्णांचे अवाजवी देयक आकारले आहे का याबाबत त्यांच्या नातेवाईकांकडून चौकशी करावी व चौकशीत अवाजवी देयक आकारल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित रुग्णालयाच्या संचालकावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी व अहवाल सादर करावा. सद्यस्थितीत दाखल सर्व रुग्ण उपचाराअंती बरे झाल्यानंतर सदर हॉस्पिटलवरील प्राधिकृत अधिकारी यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करू हॉस्पिटल सील करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.






