आगप्रकरणी धक्कादायक खुलासा : विजय वल्लभ हॉस्पिटलला आग लागली तेव्हा कर्मचारी झोपेत होते

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे विजय वल्लभ हॉस्पिटलला लागलेल्या आगीत आयसीयूतील १३ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी झोपले होते आणि आयसीयूतील रुग्णांना बाहेर काढण्यासह कुणी नव्हते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान येथील रुग्णांना आसपासच्या विविध रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसीचा स्फोट झाला. या अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला परंतु, आयसीयूतील 13 रुग्णांचा मात्र, मृत्यू झाला. या रुग्णालयात एकूण ९० जणांवर उपचार सुरू होते.

आता रुग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सगळ्यांसमोर मांडला आहे. एका मृताच्या नातेवाईकाने म्हटले आहे की, आग लागली त्यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी झोपलेले होते. आयसीयूतील रुग्णांना बाहेर काढण्यास रुग्णालयातील एकही कर्मचारी हजर नव्हता. रुग्णालयात अग्निशामक यंत्रणाही नव्हती. ही सर्व रुग्णालय व्यवस्थापनाचीच चूक असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान इथे बऱ्याच राजकीय नेते मंडळींनी हजेरी लावली असून, यात प्रामुख्याने नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here