करोना आता माऊंट एव्हरेस्टवरदेखील; गिर्यारोहकासह दोघे पॉझिटिव्ह

काठमांडू – जगभरातील कोरोना संसर्गाने ‘शिखर’ गाठले आहे. जगात सर्वाधिक उंचीचे शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकासह एका शेर्पाला करोनाची लागण झाली आहे. एर्लेंड नेस्स असे गिर्यारोहकाचे नाव असून तो नॉर्वेतील आहे. त्याला हेलिकॉप्टरमधून काठमांडूतील रुग्णालयात आणले आहे.

नेस्सने शुक्रवारी त्याला कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याला 15 एप्रिलला करोनाची लागण झाल्याचा संशय आला होता. त्यानंतर त्याला तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने माउंट एव्हरेस्टवरून काठमांडूच्या रुग्णालयात आणण्यात आले. गुरुवारी त्याच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या त्याला विलगीकरणात ठेवून उपचार केले जात आहेत. नेस्सची प्रकृती चांगली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. नेस्सने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर बराच वेळ घालवला होता.

त्याची वेळीच चाचणी केली नसती तर त्याच्यापासून इतर हजारो गिर्यारोहक, गाईड, सहाय्यकांना कोरोना संसर्ग झाला असता, असे अनुभवी गाईड ऑस्ट्रियन लुकास फर्नबॅश यांनी सांगितले. दरम्यान, नेस्ससह एका शेर्पाला करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.

माउंट एव्हरेस्टवर आणखी काही लोकांना करोना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. एव्हरेस्टवरून आणखी काही लोकांना कोरोनावर उपचार घेण्यासाठी दाखल केल्याचे काठमांडूतील एका रुग्णालयाने सांगितले. मात्र नेमकी रुग्णसंख्या जाहीर केलेली नाही. त्यामुळे नेपाळच्या प्रशासनाने एव्हरेस्टवरील कोरोनाचा संसर्ग लपवल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेष म्हणजे, नेपाळ पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी आतापर्यंत कोणत्याही गिर्यारोहकाला कोरोना झाला नसल्याचा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here