नवी दिल्ली – करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन कमी होतो हे खरे आहे. पण करोनाग्रस्तांचा मृत्यू संसर्ग झाल्यावर होत नाही तर त्यांना वेळेवर ऑक्सिजन आणि आयसीयू बेड न मिळाल्याने होत आहे. त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. सर्वत्र आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून रुग्णांचे मृत्यू मोठय़ा प्रमाणात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारला लक्ष केले आहे. रुग्णांचे वाढलेले मृत्यू म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे. करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे.
त्यामुळे त्यांना वेळेत ऑक्सिजन आणि आयसीयू बेड मिळाल्यास सहजपणे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र केंद्र सरकारने कोरोना महामारीला गंभीरपणे घेत पुरेशा आरोग्य सुविधा निर्माण केल्या नाहीत. त्यामुळेच रुग्णांचे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. त्याला मोदी सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.






