हरयाणात ऑक्सिजनची चोरी; चोरट्यांनी टँकरच केला गायब

सिरसा (हरियाणा) – कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशभरात ऑक्सिजनचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यातच हरियाणातील ऑक्सिजनची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पानीपत रिफायनरीमधून सिरसा येथे ऑक्सिजन वाहून नेणारा अख्खा टँकरच गायब करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पानिपत रिफायनरीमध्ये एअर लिक्विड नॉर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. या कंपनीतून बुधवारी रात्री एक ऑक्सिजन टँकर सिरसाला रवाना करण्यात आला होता. पानिपतहून सिरसाला पोहोचण्यासाठी सव्वा चार तास इतका कालावधी लागतो. मात्र, या वेळेत टँकरच पोहोचला नाही. तसेच टँकर चालकाचा फोनही बंद येत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गायब झालेल्या या टँकरमध्ये 8 टन ऑक्सिजन असून याची किंमत जवळपास 1 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. अलिकडेच पानिपत येथून फरिदाबाद येथे जाणारा ऑक्सिजनचा टँकर दिल्लीत लुटण्याचा प्रकार घडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here