खंडवा – मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. येथे मुलीचे लव्ह मॅरेज रोखण्यासाठी कुटुंबीयांनी तिला चक्क कोरोना पॉझिटिव्ह ठरवले आणि क्वारंटाईन केले. यामुळे लग्न तर मोडले मात्र, 14 दिवसांचा काळ संपल्यावर आपण लग्न करणार असल्याचा निर्धार तरुणीने व्यक्त केला आहे.
‘लाईव्ह हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा सर्व प्रकार खंडवा जिल्ह्यातील अमलपुरा भागात घडला आहे. येथील 19 वर्षीय तरुणी आपल्याच समाजाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. तरुणाच्या कुटुंबीयांना तरुणी पसंद होती, मात्र तरुणीच्या कुटुंबीयांचा तरुणाला नकार होता.
तरुणीने घरच्यांची समजूत काढण्याचा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यश आले नाही. अखेर प्रेमी युगुलाने जिल्हा न्यायालयात कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. याचा सुगावा लागल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली आणि ‘मुलीला कोरोना आहे’, असे सांगितले. एवढेच नाही तर आरोग्य विभागाच्या 104 या हेल्प लाईन नंबरवर फोन करून कोरोना पॉझिटिव्ह तरुणी लग्न करत असल्याची तक्रार देखील दाखल केली.
दरम्यान, कोर्टात कोरोनाचे नाव ऐकताच टायपिस्ट आणि वकिलांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले. तरुणीचे शपथपत्र बनवणाऱ्या वकिलाने तिला हात जोडून आधी कोरोना चाचणी करण्याची विनंती केली. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच मदत करू असेही सांगितले. अखेर तरुणीने जिल्हा रुग्णालयात जाऊन स्वाब दिला. मुलीचा रिपोर्ट अद्याप प्रलंबित असून तिला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.







