मुंबई (जॉनी वाझ) – बॉलीवूडमधील सध्याची सर्वात महागडी अभिनेत्री कोण? याचे उत्तर आता मिळाले आहे. ‘पद्मावत’, ’रामलीला’ आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री दीपिका पदुकोन आगामी काळात साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने सर्वाधिक म्हणजेच तब्बल 20 कोटी रुपये मानधन आकारल्याची चर्चा आहे.
सुरुवातीला दीपिका साकारत असलेल्या भूमिकेचे महत्त्व प्रभासच्या भूमिकेच्या तुलनेत कमी होते. मात्र दीपिकाचे नाव फायनल झाल्यावर कथानकात बदल करून तिची भूमिका आता आणखी महत्त्वाची केली आहे. प्रभासलादेखील या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन मिळाल्याची चर्चा आहे. वैजयंती हाऊसचा हा सायन्स फिक्शन चित्रपट असून पुढच्या वर्षी शूटिंगला सुरुवात होणार आहे. अश्विन नाग याचे दिग्दर्शन करणार आहेत. हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत चित्रपट प्रदर्शित होईल.







