मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीच्या शेवटच्या टप्प्यात सीबीआयने थेट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर सीबीआयच्या टिमने देशमुखांशी संबंधित मुंबईसह नागपूरमध्ये ठिकठिकाणी शनिवारी सकाळपासून छापेमारी करत काही महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. यासंदर्भात परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयत तसेच उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. मात्र, याच संदर्भात जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचा प्रथम जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या अन्य व्यक्तींबरोबरच अनिल देशमुख यांचीही चौकशी केली होती. यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या घरावर छापेमारी केली, यामुळे देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.







