रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; करोनाबाधितांसह ८२ जणांचा होरपळून मृत्यू

बगदाद (इराक) – इराकची राजधानी बगदादमधील एका रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात करोनाबाधितांसह ८२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ११० हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दियाला ब्रिज भागातील एबन खातिब रुग्णालयाला शनिवारी ही आग लागली. बगदादमधील रुग्णालयात झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे खळबळ उडाली आहे. अशाप्रकारची दुर्देवी घटना भविष्यात घडू नये यासाठी सर्व रुग्णालयांच्या सुरक्षा आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे सरकारचे प्रवक्ते खालिद अल मुहान्ना यांनी सांगितले.

ही आग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागापासून सुरू झाली असल्याची माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली. आग लागल्यानंतर रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांचीही धडपड सुरू होती. काही रुग्णांचा मृ्त्यू उपचारासाठी लावण्यात आलेल्या मशीन काढल्यामुळे झाला. तर, काहींचा मृत्यू गुदमरून झाला असल्याचे वृत्त आहे.

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी १० दशलक्ष इराकी दिनार इतकी रक्कम नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्याशिवाय त्यांनी आरोग्य मंत्री हसन अल तमिमि आणि बगदादचे गर्व्हरनर मोहम्मद अल अत्ता यांना पदावरून दूर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here