ए.पी.एम.सी.मार्केट परिसरातील वैद्यकीय तपासणी कक्षात नियमांचे उल्लंघन

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने गर्दी होऊ न देणे हाच त्यावर प्रभावी उपाय आहे. या अनुषंगाने राज्य सरकारसह नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. अशातच राज्य सरकारने सूचित केल्याप्रमाणे ए.पी.एम.सी.मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता मार्केट परिसरात कोरोना नियंत्रक वैदयकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आले आहेत. मात्र हे कोरोना नियंत्रकच कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरते आहे की काय अशी शंका तेथील गर्दी पाहून उपस्थित होत आहे.

नवी मुंबई महापालिकेने ए.पी.एम.सी. प्रशासनाशी चर्चा करीत ५ मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहेत. याशिवाय फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, दाणा मार्केट या तीन ठिकाणी तपासणी कक्ष सुरु केले आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम काटेकोरपणे पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात नसून मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. मात्र तरी देखील बाजार समितीचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईतील ए.पी.एम.सी. मार्केट ही आशियातील अत्यंत मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ असून त्याठिकाणी वाहनांची व माणसांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना घेत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याठिकाणी कोरोना नियंत्रक विशेष वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भाजीपाला मार्केट येथील आवक-जावक सकाळी लवकर असल्याने येथील तपासणी कक्ष सकाळी ७ ते ११ यावेळेत कार्यरत ठेवण्यात आले आहे. मात्र कोरोना नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या या वैद्यकीय तपासणी कक्षात नियमांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. बाजार समिती आणि महापालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. एकीकडे राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मार्केट परिसरात वैद्यकीय तपासणी कक्षात नियमांचे खुलेआम उल्लंघन केले जात आहे. दरम्यान, याबाबत महापालिका आणि बाजार समिती कोणती कठोर पावले उचलणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here