मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – आपल्या समाजामध्ये स्थैर्य कायम ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच झटत असतात. अगदी सामाजिक वादांपासून ते गुन्हे, दंगली अशा परिस्थितीतही समाजात शांतता ठेवण्याचं काम पोलीस (Mumbai police) 24 x 7 करत असतात. पण एवढंच नाही तर कौटुंबीक वादांमध्येही अत्यंत योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून वाद मिटवण्याचा प्रयत्नही ते करत असतात. मुंबई पोलिसांनी नुकत्यात केलेल्या अशा एका कारवाईचं कौतुक होत आहे.
मुंबईच्या ताडदेव परिसरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबामध्ये झालेल्या एका किरकोळ वादातून एक तरुणी आत्महत्या करायला निघाली होती. मात्र पोलिसांनी तातडीनं याठिकाणी पोहोचत तिची समजूत काढली आणि तिचा विचार बदलला. कुटुंबामध्ये काही तरी वाद झाल्याने 19 वर्षांची ही तरुणी तिच्या घराच्या छतावर चढली. रागाच्या भरामध्ये तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. इमारतीवरून उडी मारत जीवन संपवण्याचा निर्णय तिनं घेतला. पण थोडक्यात हा अनर्थ टळला. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या घटनेबाबत माहिती दिली.
ताडदेव पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळं तातडीनं ताडदेव पोलिस स्टेशनचं पथक संबंधित ठिकाणी पोहोचलं. पोलिसांनी तरुणीची समजूत काढत सर्वात आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणीला शांत केल्यानंतर आत्महत्येच्या निर्णयापासून तिचं मन वळवलं आणि तिला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी तिची समजूत काढली आणि तिचं समुपदेशनही केलं. ही तरुणी आता सुरक्षित असून कुटुंबाबरोबर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.






