मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – नाकाबंदीत तैनात असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिसाला वाहनचालकाने धडक देऊन फरफटत नेल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. धडक देऊन पळून गेलेल्या साहिल नाईक या चालकाला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
विजय कुंभार हे डी. एन. नगर वाहतूक चौकीत कार्यरत आहेत. तीन दिवसांपूर्वी ते त्यांच्या सहकाऱयासोबत अंधेरीच्या एम. ए. हायस्कूलजवळ नाकाबंदी करत होते. नाकाबंदीदरम्यान कुंभार यांना एक वाहन संशयास्पद येताना दिसले. कुंभार यांनी त्या वाहनाला थांबण्यास सांगितले तेव्हा त्याकडे वाहनचालक साहिलने दुर्लक्ष करून कुंभार यांना धडक दिली.
धडक दिल्यानंतर कुंभार काही अंतर फरफटत गेल्यामुळे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच डी. एन. नगर पोलीस घटनास्थळी गेले. जखमी झालेल्या पुंभार यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी नाईकला अटक केली.






