औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील अवघ्या एका महिन्याच्या करोना बाधित बाळाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या बाळासह जिल्ह्यात २६ बाधितांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या २ हजार ४२७ वर पोहचली आहे. त्याच वेळी जिल्ह्यात ९५८ नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या एक लाख २० हजार ५६६ वर पोहचली आहे.
दरम्यान, सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील अवघ्या एका महिन्याच्या करोना बाधित बालकाला २१ एप्रिलला घाटीत दाखल करण्यात आले होते. श्वसनविकार, न्यूमोनिया, मेंदूविकार आणि अन्य गंभीर गुंतागुंतीमुळे संबंधित बालकाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाने दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी १४०९ करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे एकूण करोनामुक्त व्यक्तींची संख्या एक लाख पाच हजार ६४१ वर पोहचली आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार ४९८ करोना बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.






