परभणी (प्रतिनिधी) – संचारबंदी आणि कठोर निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असताना परभणीतील जिंतूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दुकानदाराने गस्तीवरील पोलिसाच्या हातातील लाठी हिसकावून घेत त्याला मारहाण करण्याच प्रयत्न केल्याने तसेच शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित दुकानदाराला ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरात गस्त सुरू असताना पोलिसांना बलसा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ऋषिकेश हे दुकान सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे दुकानाचा मालक प्रल्हाद टाकरस याला पोलिसांनी हटकले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या हातातील लाठी हिसकावून घेत त्याने पाटील यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांना शिवीगाळही त्याने केली. भररस्त्यात हा प्रकार सुरू होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून पोलीस जीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असता तिथेही त्याने प्रतिकार केला. त्यानंतर पोलिसांनीही कायदा मोडणाऱ्या या दुकानदाराला लाठीचा प्रसाद दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला असून दुकानदाराकडून पोलिसांवर अशाप्रकारे दादागिरी करण्यात आल्याने नागरिकांमधूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.






