औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना येथील कोविड केअर सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याची औरंगाबादेत चढ्या दराने विक्री करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनेश कान्हू नवगिरे (२८), साईनाथ अण्णा वाहूळ (३२), रवि रोहिदास डोंगरे तसेच संदीप सुखदेव रगडे (३२), प्रवीण शिवनाथ बोर्डे (२७), नरेंद्र मुरलीधर साबळे (३३) आणि अफरोज खान इकबाल खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. जमादार विशाल पाटील यांनी बनावट ग्राहक बनून टोळीचा मुख्य सूत्रधार दिनेश नवगिरे यास रेमडेसिविर इंजेक्शनसाठी फोन केला. इंजेक्शन देताना पथकाने दिनेशला पकडले.
चौकशीदरम्यान त्याने जालना येथील कोविड सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या सर्व साथीदारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५ रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.






