सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – उन्हाळा आला की लिंबू सरबत आणि उसाच्या रसाची आठवण सर्वांनाच होते. हल्ली सोशल मीडियावरदेखील उसाचा रस एका वेगळ्याच चर्चेत आला आहे.
सोलापुरातील बार्शीतल्या काही मुलांनी चक्क उसाच्या रसावर रॅप सॉंग तयार केले आहे. अवघ्या काही दिवसांत हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून आतापर्यंत गाण्याला लाखो व्हय़ुज मिळाले आहेत.
‘थंडगार रस, एकदा तुम्ही प्या हो इथला ज्यूस… पांडबाच्या रानातला ऊस, तुमचं मन होईल खूश’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत. ‘डेस्पासितो’ या इंग्रजी गाण्याच्या चालीवर या गाण्याचे सादरीकरण केले आहे. उसाच्या रसाचे मार्केटिंग करण्यासाठी ‘खास रे’ हा यू-टय़ूब चॅनेल चालवणाऱ्या तरुणांनी या रॅप सॉंगची निर्मिती केली आहे. त्यांच्या या उत्स्फूर्त अविष्काराला आणि कल्पनाशक्तीला लाखो चाहत्यांनी लाइक केले आहे.






