औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा येथील पंतप्रधान आवास घरकूल योजनेतंर्गत मंजूर झालेली रक्कम लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच पतीला 20 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रंगनाथ सुभाष देवकाते असे आरोपीचे नाव आहे.
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील तक्रारदाराला पंतप्रधान आवास घरकुल योजनेतंर्गत 1 लाख 20 हजार रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 15 हजारांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली होती. त्यानंतर दुसरा हप्ता 45 हजार रुपये लाभार्थीच्या खात्यावर टाकण्यासाठी काजळा गावच्या महिला सरंपचाचे पती तथा ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते (वय – 20) यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेटलाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत विभागाकडे तक्रार येताच सदर प्रकरणाची पडताळणी केली असता आरोपीने तक्रारदाराला अनुदानाचा दुसरा हप्ता टाकण्यासाठी 30 हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पंचासमक्ष 29 एप्रिल रोजी सापळा रचून काजळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात लाभर्थ्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना आरोपीला रंगेहाथ पकडले.
सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलीस उपअधिक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक एस.एस. शेख, पोलीस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गजानन कांबळे, ज्ञानेश्वर म्हस्के, शिवाजी जमधडे यांनी पार पाडली.






