युवकाच्या मृत्यूनंतर विले पार्लेला पोलिस छावणीचे स्वरूप

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दय) – पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या आरोपाखाली एका २६ वर्षीय युवकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी बुधवार, २८ एप्रिल रोजी विले पार्ले एअरपोर्ट पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अजय गुंजाळ असून त्याचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला, असे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद केले आहे; परंतु मृत अजयला पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

२१ एप्रिल रोजी मुंबईतील विले पार्ले पश्चिम द्रुतगती महामार्ग येथील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या अजय गुंजाळ आणि एका रुग्णवाहिका (अँब्युलन्स) चालकाचा वाद झाला होता. त्यानंतर त्या रुग्णवाहिका चालकाने या वादाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असता विमानतळ पोलिसांनी अजय गुंजाळ याला घरात घुसून मारहाण करत पोलिस ठाण्यात नेले, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले.

त्यानंतर काही तासांनी पोलिसांनी अजयला सोडून दिले. मात्र त्यानंतर त्याची तब्येत खालावली. त्यामुळे अजय गुंजाळला अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले, परंतु २८ एप्रिलला दुपारी ३ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अजय याचा मृत्यू हा डेंग्यूमुळे झाला आहे असे जरी दिले गेले असले तरी अजयचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे, असा आरोप त्याच्या परिवाराने केला आहे. त्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा यासाठी शास्त्रीनगर येथील रहिवाशांनी पश्चिम द्रुतगती मार्गावर रस्ता रोखत पोलिसांविरुद्ध तीव्र निषेध केला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे कळल्यानंतर स्वतः पोलिस उपायुक्त (डीसीपी) मंजूनाथ सिंगे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत, ते दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल, असे मंजूनाथ सिंगे यांनी आश्वासन दिले होते परंतु बुलंद पोलिस टाइम्सने उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांच्याशी संपर्क साधला असता सिंगे यांनी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत युवकाला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झालेले असतानाही मृताचे नातेवाईक पोलिसांवर खोटे आरोप करत आहेत व पोलिसांना बदनाम करत आहेत, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here