आटपाडी तालुक्यात १००० खाटांचे कोरोणा उपचार सेंटर सुरु करण्याची राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ना . जयंतराव पाटील यांचेकडे मागणी .

आटपाडी (प्रतिनिधी) – आटपाडी तालुक्यातल्या ७ गावात एकूण १००० खाटांचे कोव्हीड सेंटर साकारणे , प्रत्येक मतदान बुथ वर लसीकरण केंद्र सुरु करणे.कायमस्वरूपी २०० खाटांचे जिल्हा – प्रादेशिक रुग्णालय आटपाडी येथे उभारणे आणि ऑक्सीजन प्लांट निर्मिती बरोबर तिसऱ्या लाटेला नेस्तनाबूत करण्याच्या नियोजना बाबतचे निवेदन आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हयाचे पालकमंत्री ना.श्री जयंतराव पाटील यांना पाठविले आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अश्विनी अष्टेकर – कासार, महिला राष्ट्रवादी च्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ . सुजाता टिंगरे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन पाठविले असून आटपाडीचे नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाची प्रत दिली आहे .

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या निवेदनात , कोरोणा महामारीने आटपाडी तालुक्यात मोठा उच्छांद मांडला असून दि .२९ एप्रील अखेर कोरोणा झालेल्या रुग्णांची संख्या ४४७३ इतकी आहे . कोरोणातून मुक्त झालेले ३३९१ जण आहेत . कोरोणा पॉझीटीव्ह म्हणून आज तालुक्यात ६३ रुग्णांची नोंद झाली असून आजअखेर कोरोणाने मृत झालेल्यांची संख्या ५९ इतकी आहे . कोरोणावर उपचार घेत असलेले १०९७ रुग्ण असून त्यापैकी कोवीड सेंटर आटपाडी येथे ६४, ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे २८, सुविधा – गुरुकुल सेंटर आटपाडी येथे ४०, श्रीसेवा हॉस्पीटल आटपाडी येथे ४० , श्रीनाथ कोवीड सेंटर खरसुंडी येथे १५ , शेटफळे हायस्कुल येथे १९ जण उपचार घेत आहेत तर ८७१ सामान्य स्थितीतल्या कोरोणा रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत . तालुक्यातले अनेक रुग्ण तालुक्या बाहेरही उपचार घेत आहेत . तालुक्यातल्या २१५४५ जणांचे लसीकरण झाले आहे .१८७०४ जणांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे . तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या २८४१ इतकी आहे . तथापी गेल्या दोन दिवसापासून लसी अभावी तालुक्यातले लसीकरण थांबले आहे . तालुक्यातील लसीकरण त्वरीत सुरु करून प्रत्येक मतदान बुथ वर लसीकरण केंद्रे सुरु करीत लसीकरण युद्धपातळीवर पुर्ण केले जावे.

sadik-khatik-aatpadi
आटपाडी तालुक्यातील आटपाडी, शेटफळे, दिघंची, करगणी ,नेलकरंजी, खरसुंडी, झरे येथे कोरोणा रुग्णांवर उपचार करणारी कोव्हीड सेंटर तातडीने सुरु करणे गरजेचे आहे . आटपाडी येथे गंभीर रुग्णांसाठी २०० खाटांचे, मध्यम लक्षणांच्या रुग्णांसाठी २०० खाटांचे असे एकूण ४०० खाटांचे कोव्हीड सेंटर तातडीने सुरु करणे अत्पंत गरजेचे आहे . तर दिघंची, शेटफळे, करगणी, नेलकरंजी, खरसुंडी, झरे येथे गंभीर रुग्णासाठी प्रत्येकी २५ खाटांचे तर मध्यम लक्षणांच्या रुग्णांसाठी प्रत्येकी ७५ खाटांचे असे एकुण प्रत्येकी १०० खाटांचे कोव्हीड सेंटर तातडीने सुरु केले जाणे अत्यंत महत्वाचे आहे . तालुक्यात ७ ठिकाणी गंभीर रुग्णांसाठी ऑक्सीजन, व्हेंटीलेटर युक्त ३५० खाटांची आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांसाठी ६५० खाटांची अशी एकूण १००० खाटांच्या विविध कोव्हीड सेंटरची आवश्यकता आहे.

अत्यंत आवश्यक ठरत असलेल्या रेमडेसीव्हीर या इंजेक्शनची प्रतिदिनी १२० ची गरज असून त्यापैकी फक्त २० च रेमडेसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत असल्याचे कळते . सदरची इंजेक्शन अन्य ठिकाणाहून उपलब्ध करताना सर्वसामान्य, गरीब, मागासवर्गीय रुग्णांना मोठ्या रकमा अदा करताना नाकी नऊ येवू लागले आहे . काही ठिकाणी औषधे गोळ्यांसाठी ही मोठी परवड होत आहे.

कोरोणा महामारीच्या या संकटात सरहद्दीवरील माण, माळशिरस, सांगोला, खानापूर तालुक्यातील अनेक रुग्ण आटपाडीत उपचार घेत आहेत . शंभर ते सव्वाशे किलोमीटर दुर असलेल्या सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आटपाडी तालुका हा या जिल्हयातल्या ८ माणदेशी तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, आटपाडी येथे कायमस्वरूपी मोठे सुसज्ज आरोग्य केंद्र व्हावे . ही गेल्या ३० वर्षापासूनची मागणी आहे . आपल्या समर्थनाने आणि आपल्या सरकारने आटपाडी येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली आहे, तथापि हे रुग्णालय अद्याप अस्तित्वात आले नसल्याने आटपाडी येथे खास बाब म्हणून २०० खाटांचे अद्ययावत जिल्हा – प्रादेशीक स्तरावरचे रुग्णालय उभारून माणदेशी ८ तालुक्याना न्याय द्यावा ही आमची आग्रही मागणी आहे.

अनेक पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून अनेक महनीय, मान्यवर सोन्याची लंका साकारण्यासाठी आपली कारकीर्द खर्ची घालत असल्याचे आपण पाहतोच . तथापि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेरच्या भाळवणीत उभारलेले शरद पवार आरोग्य मंदिर कोव्हीड सेंटर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे . शंभर ऑक्सीजन बेड सह एकूण ११०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारणाऱ्या आमदार लंके यांनी तेथील रुग्णांसाठी औषधां सोबत पौष्टीक आहार, विविध प्रकारची फळे ,अंडी, दुध,शाकाहारी, मांसाहारी जेवणाची सोय उपलब्ध करून देवून मोठे काम केले आहे . जनतेच्या पाठबळाने हे नेक काम करणाऱ्या आमदार लंके यांनी, माझं काय व्हायचं ते होवू दया , मात्र मी घाबरून घरातच बसलो तर माझ्या मायबाप जनतेने कोणाच्या दारात जायचे, मी असुरक्षित असलो तरी चालेल परंतू माझी जनता सुरक्षित राहीली पाहीजे या वज्र निर्धाराने ते तेथे कार्यरत आहेत . येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची ते आस्थेने विचारपुस करतातच शिवाय ते स्वत : ताप आणि ऑक्सीजन चे प्रमाण देखील तपासतात . या कोव्हीड सेंटर मध्ये रुग्ण दाखल होण्यापासून त्याचा डिस्चार्ज होईपर्यत सर्व देखभाल केली जाते .पाच ट्रक अन्न धान्य आणि पंचवीस ते तीस लाख रुपये लोकवर्गणी जमा करून जनतेच्या आरोग्यासाठी झोकून देणाऱ्या आमदार निलेश लंके यांचा आदर्श सर्वत्र घेतला जावा ही प्रांजळ भावना आहे.

सदय स्थितीत मागणी केलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करीत उपाय योजना तातडीने कराव्यातच तथापि कोरोणा महामारीच्या दुसऱ्या लाटेत उडालेली त्रेधातिरपीट पाहता येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आटपाडी तालुक्यात ऑक्सीजन प्लांट ची ही तातडीने निर्मिती केली जावी . आवश्यक औषधांचा मुबलक प्रमाणात साठा तालुका स्तरावर उपलब्ध करून दिला जावा ,केला जावा . तिसऱ्या लाटेला निष्क्रीय करण्याचे योग्य ते नियोजन केले जावे . हीच प्रांजळ भावना आणि मागणी आहे . आपण या मागण्यांना न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here