४५ हजार युवतींची सेना उभी करणाऱ्या – रामप्यारी चौहान

समरकंद म्हणजे सध्याचा उझबेकिस्तान. तिथला क्रूर शासक तैमूर. भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला. अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. तो अत्यंत क्रूर, निर्दयी, दुष्ट होता. तैमूरच्या अमानुष अत्याचारांचे किस्से ऐकून कुणाचाही थरकाप उडेल! अफगाणिस्तानचा प्रदेश जिंकून तैमूर पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या दिशेने निघाला. हरिद्वार उध्वस्त करून पुढे सरकू लागला. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी कितीही प्रतिकार केला तरी तैमूरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागला नाही.
शासक, राजे महाराजे थकले तरी सामान्य भारतीय जनता हार मानणारी नव्हती. उत्तर भारतात त्याकाळात असलेल्या विविध जाती, जमातींच्या प्रमुखांनी एकत्र येऊन देश आणि धर्माच्या रक्षणार्थ समिती तयार केली. आमने-सामने लढून तैमूरला कुणी हरवू शकणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले.
जोगराजसिंग परमार यांना सर्वांनी आपले प्रमुखपद दिले. गावोगावचे तरूण लढण्यासाठी आले. साधी सामान्य माणसं ती. लढता कुणालाच येत नव्हते. पण संकट काय आणि किती भयंकर आहे याची सर्वांना कल्पना होती. आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग यांनी सर्व तरूणांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
इ.स. १३०५ मधे हरिद्वारजवळ कुंजासन हाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग छोटे संस्थानिक होते. इस्लामी आक्रमकांनी त्यांच्या संस्थानात धुमाकूळ घातला. छोटेसे, साधे, समाधानी संस्थान इस्लामी आक्रमकांनी नष्ट केल्याने जोगराजसिंग गावोगावी फिरून युवकांना स्वातंत्र्य आणि संघर्षासाठी प्रेरित करत होते. जोगराजसिंग परमार यांच्या हाताखाली लढण्यासाठी ८० हजार युवक देशभरातून आले. सर्व जातीजमातींच्या प्रमुखांची महापंचायत पुन्हा एकत्र आली. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न होता.
गावोगावच्या मुली-महिलासुद्धा लढायला तयार होत्या. सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केला. स्त्रीसेना तयार करायची. त्यांनाही प्रशिक्षण द्यायचे. ४५ हजार युवतींची सेना उभी राहिली.त्यांची सेनापती होती, रामप्यारी चौहान!
कोण होती ही रामप्यारी?
उत्तर प्रदेशात सहारणपूर गावात रामप्यारीचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकणाऱ्या रामप्यारीचे मन अन्यायाविरुद्ध पेटून उठले होते. अन्यायाचा प्रतिकार करायचा तर शरीर मजबूत हवे. बलशाली, मजबूत, शक्तिमान शरीर हवे तर व्यायामाला पर्याय नाही! रामप्यारी पहाटे लवकर उठून आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर गावाबाहेरच्या आपल्या शेतात जायची. धावणे, पोहणे, वजन उचलणे, झाडावर चढणे, असे वेगवेगळे भरपूर व्यायाम करायची. गावकरी तिच्यावर टीका करत. पण तिचे आई-वडील ठामपणे तिच्या पाठीशी होते.
गावच्या पंचांसमोर तिने व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. ७-८ मुली असल्या तरी दोन इस्लामी शिपायाचा प्रतिकार करू शकत नाहीत. कारण त्यांच्यात शक्ति नाही. आत्मविश्वास नाही. भरपूर व्यायाम केला तरच शक्ति येईल. शक्ति असली तरच आत्मविश्वास निर्माण होईल! रामप्यारीचे मत सर्वांनाच पटले. तिने सांगितलेला उपाय सहज साध्य होता. तिच्या गावातल्या युवती व्यायाम करू लागल्या. बातमी वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या गावांमधेही स्त्रियांच्या शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले.
यातून उभी राहिली ४५ हजार युवतींची सेना!
हा काळ होता इ.स. १३३०!
एका पायाने लंगडा असलेला तैमूर दिल्ली नष्ट करून पुढे सरकत होता. पण त्याला आश्र्चर्य वाटले. त्याचे सैन्य पोहोचण्याआधीच गावातील धनधान्य घेऊन नागरीक गायब झालेले असत. मग लुटायचे काय? मारायचे कुणाला? अत्याचार करायचे कुणावर? फार काय विहिरीतील पाण्यात घाण, कचरा मिसळून लोक जात असत. सैनिकांची उपासमार होऊ लागली. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे सरकत असे. तर जंगलात झाडावर लपून बसलेले भारतीय सैनिक हल्ले करायचे. त्यांच्या छावण्या जाळायचे. पाण्याच्या पखाली फोडायचे.
दिवसा आमने-सामने लढाया करायला काही पुरूष सैनिक पुढे येत असत. रात्री जाळपोळ, छुपे हल्ले! गनिमीकाव्याने तैमूर हवालदिल झाला. रामप्यारीच्या स्त्रीसेनेच्या गनिमीकाव्याने त्याच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. या तरूणी अगदी पद्धतशीरपणे छुपे हल्ले करत. कुणालाही रात्रीची झोप लागणार नाही याची काळजी त्या घेत. हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो ब्राह्मणी, रामदाई त्यागी यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी होती.
एखादी तुकडी अलग करून कापून काढणे, तंबूना आगी लागणे, अचानक पिसाळणारे हत्ती, सततचे जागरण आणि उपासमार! तैमूरचे एक लाख वीस हजार सैन्य अगदी जेरीला आले. बरेच सैनिक तडफडून मेले. मेरठवर हल्ला करण्याचा तैमूरला पश्र्चाताप झाला. तिथे लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक अचानक चहुबाजूंनी चालून आले. त्यांनी सैनिकांच्या तुकड्या तयार केल्या होत्या. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे. तीच गोष्ट स्त्रीसेनेची! दिवसा आणि रात्री छुपे हल्ले करण्यासाठी रामप्यारीने तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी झाडांवर लपून बाणांनी तैमूरच्या सैनिकांना मारत असे. लगेच लपलेल्या दुसऱ्या युवती पुढे येऊन त्यांची शस्त्रे गोळा करत. तैमूरचा दारूगोळा त्या त्याच्याच सैन्यावर चालवत असत.
पुरूष सैनिकांचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया तैमूरच्या दिशेने निघाला. त्याच्या अंगरक्षकांना हरवीरसिंगने बरोब्बर उडवले. बाहेरचे रक्षकांचे कडे संपवून हरवीरसिंग पुढे जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र ती आपल्या तुकडीसह मैदानात उतरली. सपासप वार करत ही स्त्रीसेना तैमूरपर्यंत पोहोचली. चपळाईने लढणाऱ्या त्या मुलींकडे बघून तैमूरचे सैनिक गोंधळले. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या या तुकडीचा धोका खिजराखानाच्या लक्षात आला. त्याने तैमूरचा घोडा खेचून सटकण्याचा प्रयत्न केला.
२२ हजार सैनिकांना घेऊन जोगराजसिंगने आघाडी घेतली. घमासान लढाई सुरू झाली. तैमूर चक्क पळून जात होता. रामप्यारीने हे पाहिले. तिने सपासप बाण चालवले. तैमूरचा पाठलाग करत ती घोडा दौडवत होती. त्याने चिलखत घातले होते. पण काखेच्या खालचा उघडा भाग अचूक हेरून तिने बाण सोडले. तो घायाळ झाला. रामप्यारीने त्याला गाठून तलवारीने सपासप वार केले. टोकावर विष लावलेल्या बाणांनी तैमूर बेशुद्ध पडला. खिजराखान सैनिकांसह पुढे येतांना दिसताच रामप्यारी जंगलात गायब झाली.
भारतावरचे आक्रमण गुंडाळून तैमूर समरकंदला परत गेला. गळा, छाती आणि बगलेतील जखमांमुळे तैमूर लवकरच मेला. उझबेकिस्तानात तैमूरला शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक मानून त्याचे पुतळे उभारले आहेत.
देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सामाजिक एकीकरण, स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युद्धात उतरणारऱ्यांना भारतीय लोक विसरले. तैमूरसारख्या क्रूरकर्मा योद्ध्याला आमने-सामने लढून मरणाच्या दारात पोहोचवणाऱ्या रणरागिणी रामप्यारी चौहानला मानवंदनाही आम्ही देत नाही!
हा इतिहास कधीच सांगितला जात नाही. तैमूर चा इतिहास शिकवला जातो पण त्याला प्रतिकार झाला व तो घाबरून पळून गेला हे सांगितले जात नाही. मराठीत लंगडत चालणाऱ्याला तैमूर म्हणतात. परंपरा इतिहास जपते तो असा. रामप्यारी ला मानाचा मुजरा !! इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here