- ४०० बेडच्या प्रवरा कोविड सेंटरचे लोकार्पण
शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – कोविड संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली. आरोग्याची काळजी घेतानाच भिती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्वाचा वाटू लागला. कोविड सेंटरमधून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही एक माणुसकीची सेवा आहे, असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात ४०० बेडचे प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण कोविड नियमांचे पालन करून करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलीक, समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज, माजी मंत्री, आण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदि याप्रसंगी उपस्थित होते. इंदुरीकर महाराज यांनी अतिशय मार्मीक शब्दात कोविड संकट निवारण्यासाठी शाब्दीक कोट्या केल्या. या संकटामुळे माणसाला मृत्यु जवळ दिसायला लागला असला तरी, मनाचा खंबीरपणा आपल्याला कायम ठेवावा लागेल. मी कोरोना होवूच देणार नाही, हा नवा मंत्र घेवून पुढे जावे लागेल. कारण या संकटाने जीवन क्षणीक करून टाकले आहे. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्वाचा वाटू लागला.

रुग्णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागली असल्याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, विखे पाटील परिवाराने सेवेचा हा गुण जोपासत या संकटात केलेले सेवेचे काम हे दैवी शक्तीच्या गुणातूनच होते. ह.भ.प.उद्धव महाराज मंडलीक म्हणाले की, संयम, नियम आणि बंधने पाळून या संकटाचा सामना आपल्या सर्वांना करावा लागला आहे. अनेक जन आपत्तीचा काळ संधीचा काळ मानतात. यावर राजकीय दावे प्रतिदावे केले जातात. परंतू अडचणीच्या काळातच कर्तुत्व आणि नेतृत्व समजते. विखे पाटील परिवाराने या संकटाच्या काळात समाजाला आपले मानले आहे. त्या कुटुंबियांकडून होत असलेली गरिबाची सेवा घडत असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले.
संस्थेचे चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कोविड केअर सेंटरची माहिती देताना सांगितले की, ४०० बेडची उपलब्धता या केंद्रात केली आहे. यामध्ये लवकरच ९० बेड हे ऑक्सिजन सुविधेसह तयार करण्यात येणार असून तज्ञ वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, आणि रूग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी प्रवरा हॉस्पीटल, विखे पाटील फाउंडेशन, शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातून एक हजार बेडची व्यवस्था करण्यात आली होती. पण वाढती रूग्णांची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण विचारात घेवून हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून याचा मोठा दिलासा परिसरातील नागरिकांना मिळेल.
याप्रसंगी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, प्रवरा कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, पंचायत समिती सभापती नंदाताई तांबे, कैलासराव कोते, रामभाऊ भुसाळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पा. गोंदकर, जिल्हा परिषद सदस्या ॲड. रोहिणीताई निघुते, दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, गुलाबराव सांगळे आदि उपस्थित होते.






