मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – सध्याचा काळ हा कोरोनाचा कठीण काळ आहे. आजूबाजूचे वातावरण मन सुन्न करणारे आहे. तरीही या कठीण परिस्थितीत त्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचं काम जो तो आपआपल्या परीने करीत आहे. आपण काही तरी समाजाचं देणं लागतो या कृतज्ञ भावनेने प्रत्येकजण आपला खारुताईचा वाटा उचलून हा ‘आरोग्याचा रामसेतू’ बांधण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यासाठीच अस्मिता संस्थेचे सर्व विश्वस्त, तिन्ही विभागांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी, संस्थेचे कार्यालयीन कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, तसेच रा. स्व. संघ, सहार विभागातील भाग कार्यकारणी व सर्व नगर कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी सामाजिक बांधिलकीतून १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन व संस्थेचा वर्धापनदिन या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून ‘रक्तदान शिबिर’ आयोजित करुन यशस्वी केले. प्रथम सकाळी ठीक ८ वाजता झेंडावंदन झाले. नंतर ठीक ९ वाजता रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले व सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर पारखी सर यांनी स्वतः रक्तदान केले.
रा. स्व. संघ, सहार भाग व अस्मिता संस्था यांनी संयुक्तपणे आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास अपेक्षेपेक्षा जास्त अनुकूल व उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी एकूण १५५ रक्तदात्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना चहाऐवजी आयुर्वेदिक आयुष काढा व ग्लुकोज बिस्कीट पुडा देण्यात आला. तसेच भेटवस्तू म्हणून व्हिटॅमिन-सी युक्त संत्र्याच्या नैसर्गिक रसाची बाटली देण्यात आली. सर्वांचे आशिर्वाद, मार्गदर्शन व सहभागा मुळेच सामाजिक वावराचे नियम पाळून यशस्वीरीत्या हा रक्तदान शिबीर उपक्रम राबविला गेला. आज संकलित केलेल्या रक्तामुळे अनेक गरजू लोकांचे नक्कीच प्राण वाचतील.
रा. स्व. संघ, सहार भाग व अस्मिता संस्थेचे सर्व कार्यकर्ते, रक्तदाते आणि सहभागी झाले होते. यावेळी रक्त संकलन करण्यासाठी जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रोमा केअर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.






