औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना शहरातील सोनलनगर भागात सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी आतमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. शुक्रवारी 30 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. लुकस बंडुजी गायकवाड, प्रकाश घोडके, बाबा बेग अशी मृत कामगारांची नावे आहेत.
या घटनेविषयी कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की, सोनलनगर भागात राहणारे बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कडेवार व अन्य तीन घरांचा मिळवून एकच सेप्टिक टँक आहे. हा टँक स्वच्छ करण्याचे काम त्यांनी याच परिसरात राहणाऱ्या खाजगी कामगारांना दिले होते. टँक स्वच्छ करण्यासाठी लुकस गायकवाड, प्रकाश घोडके (दोघे रा. रमाईनगर), व बाबा सय्यद बेग (रा. रहीमनगर) हे तिघे सायंकाळी सहाच्या सुमारास टँकमध्ये उतरले.
टँक स्वच्छ करत असताना तिघांचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यातील दोघांचा सेप्टिक टँकमध्येच तर बाबा बेगचा खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सहायक निरीक्षक निशा बनसोड, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, नगरसेवक महावीर ढक्का हे घटनास्थळी पोहचले.
अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. दरम्यान, घटननेनंतर नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृतदेह लवकर ताब्यात देऊन घरमालकावर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाइक आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.






