ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ बड्या अधिकाऱ्यांवर विविध कलमांनुसार अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी पोलीस निरिक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा शुक्रवारी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरिता वर्ग करण्यात आला आहे. कल्याणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. यामुळे परमबीर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रार अर्जावरून परमबीर यांच्यासह ३३ जणांविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २२ कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून शुक्रवारी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला. परमबीर सिंह हे ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस महासंचालकांकडे केली होती. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी (ऑनलाईन) कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.
एकीकडे या तक्रारीमध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार बड्या पोलिस अधिकाऱ्यांसह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २ तत्कालीन आयुक्तांसह चार ते पाच अधिकाऱ्यांसह एकूण ३३ बड्या धेंड्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह ३३ अधिकाऱ्यांविरोधात कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.






