बाजार सावंगी (प्रतिनिधी.मूनीर शाह) – खुलताबाद येथील महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदिप विद्या मंदिर,शाळेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ लक्ष्मी भारती यांची नुकतीच ऑल महाराष्ट्र महा एनजीओ फेडरेशन समितीच्या राज्य उपाध्यक्षा म्हणून निवड झाली आहे.
खुलताबाद तालुक्यातील गोरगरीब मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने डॉ लक्ष्मी भारती यांनी सन 2004 साली यशोदिप विद्या मंदिर या शाळेची स्थापना केली.अल्पावधीतच शाळा तालुक्याचं नव्हे तर जिल्हाभरात नावारूपाला आली. शाळेची गुणवत्ता पाहुन तालुक्यातील खेड्यातील शेकडो मुले शाळेत येऊ लागली. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा नावारूपाला आणली.मोफत आणि दर्जेदार शिक्षण देऊन भारती यांनी समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला होता.
आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उदार हेतूने शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे सामाजिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कार्य आहे.शाळेतील गरीब मुलांना गणवेश वाटप करणे,महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे,निराधार महिलांना रोजगार मिळावा या करिता शिलाई मशिन वाटप करणे, संसारपयोगी साहित्य देणे अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा हातभार आहे.त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा विचार करून डॉ लक्ष्मी भारती यांना आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय असे शेकडो पुरस्कार मिळाले आहेत.या पुरस्कारामुळे मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते असे त्या नेहमी सांगतात.
याशिवाय अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेत त्यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती केलेली आहे.एक महिला असूनही त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य वाखाणण्याजोगे आहे.हिच बाब लक्षात घेऊन डॉ लक्ष्मी भारती यांची ऑल महाराष्ट्र महा एनजीओ फेडरेशन समितीच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.यामुळे त्यांचे संस्थेचे पदाधिकारी,शाळेचे सर्व शिक्षक,राजकिय पुढारी आशा सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.






