कोरोनाच्या संकटात डॉ. नेनेंचा वारसा जपतंय ‘बार्शीचं कॅन्सर हॉस्पिटल’

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – देशाच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठं कॅन्सर हॉस्पीटल म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नर्सिग दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटलच्या कोविड काळातील सेवेचं सध्या बार्शीत चांगलंच कौतुक होत आहे. येथील रुग्णांवर अल्प दरात उपचार होत असल्याने कोविड काळातही डॉ. नेने साहेबांचा वारसा या रुग्णालयाने जपल्याचं दिसून येतंय. एकीकडे रुग्णांकडून भरमसाठी बिल आकारणी करणारी खासगी रुग्णालये असताना, तुलनात्मकदृष्ट्या कॅन्सर हॉस्पीटल कमी खर्चात चांगली सेवा देत आहे. त्यामुळेच, सोशल मीडियातूनही या रुग्णालयाचे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यात कोरोनाची पहिली लाट आल्यापासून माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनात या रुग्णालयाने बार्शीची वैद्यकीय गरज ओळखून डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर सुरू केले. जवळपास 40 बेडचं सुसज्ज सेंटर उभातल्याने बार्शीसह मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी सोय झाली. विशेष म्हणजे हॉस्पीटलमधील सोयी सुविधा, स्टाफकडून मिळणारी वागणूक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या जनतेला अल्प दरात उपचार मिळाल्याने या रुग्णालयास रुग्णांनी प्राधान्य दिले. गतवर्षी भाजपा नेते आणि विधानपरिषद आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनीही याच रुग्णालयात कोरोनावर मात केली. तर, काही दिवसांपूर्वी बार्शीपुत्र आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्याही जवळच्या नातेवाईकांनी येथेच कोरोनाला हरवले.

बार्शीचे दुसरे भगवंत असलेल्या डॉ. नेनेसाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत अत्यल्प दरात सेवा दिली. लंडनमधील मोठं करिअर सोडून त्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आणि वैद्यकीय सेवेसाठी जीवन समर्पित केलं. त्यांच्या पुढाकारानेच हे रुग्णालय उभारलं, नावारुपाला आलं आणि कित्येक रुग्णांसाठी जीवनदायनी, संजीवनी बनलं. नेनेसाहेबांनी आयुष्यभर लोखंड गल्ली येथील उंबराच्या झाडाजवळ असलेल्या माडीवर आपला छोटेखानी दवाखाना चालवला. आपल्या आयुष्यात सेवाभाव हाच उद्देश त्यांनी जपला. त्यांचा हाच वारसा कोविड काळातही कॅन्सर हॉस्पीटलमध्ये पाहायला मिळत आहे.

केवळ कोविडच नाही, तर कॅन्सरवरील रुग्णांवरही कमी खर्चात उपचार करण्याचा वसा या संस्थेनं कायम जपलाय, तोच वसा कोविड काळातही आपल्याला दिसतोय, असे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी म्हटलंय. सध्या, डॉ. सोमानी, डॉ. माढेकर मॅडम, डॉ. योगेश कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली येथील कोविड रुग्णांवर उपचार होत आहेत. तर, खजिनदार बन्सीधर शुक्ला, संचालक मंडळासह प्रशासकीय अधिकारी परांजपे आणि नर्गिंस व पॅरामेडीकल सपोर्टीव्ह स्टाफ काळजीपूर्वक लक्ष देऊन सर्वोतोपरी सेवा बजावत आहे.

बार्शीला मोठा वैद्यकीय वारसा आहे, मेडिकल हब म्हणून मराठवाड्यातही बार्शीचा नावलौकिक आहे. कर्मवारी मामासाहेब जगदाळे, डॉ. नेनेसाहेब, डॉ. नाना सामनगावकर, डॉ. कश्यपी, डॉ. साने, डॉ. बोपलकर यांचा वारसा लाभलेल्या बार्शीत आज कोविड महामारीच्या काळातही काही रुग्णालयाकडून रुग्णांची लूट सुरू आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे होरपळलेल्या जनतेला बिलाचा अति भार सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने नेमलेले ऑडिटर केवळ बेरीज-वजाबाकीचंच काम करताना दिसत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांमध्ये प्रशासनाबद्दलही राग आहे.

कॅन्सर हॉस्पीटमध्ये कोविड रुग्णांवर 20 हजारांपासून ते 50 हजारांपर्यंत अल्प दरांमध्ये उपचार होत आहेत. त्यामुळे, रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करणाऱ्या रुग्णांनी या रुग्णालयाचा आदर्श घ्यायला हवा. कोविड ही महामारी आहे, या काळाचा नक्कीच इतिहास लिहला जाईल, तेव्हा आपलं नाव आदराने घेतलं जावं, ना की उपहासाने. कारण, या संकटात लोकं केवळ आपलं बिलच नाही, तर डॉक्टरांचं देवत्व अन् डॉक्टरांची नैतिकताही बिलाच्या चिठ्ठीत तपासत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here