पत्नीसह लग्नाच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला; पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – लग्नाचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्यासाठी पत्नीसह चक्क तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.

सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक तरुण त्याच्या पत्नीसह तलवारीने केक कापताना दिसत आहे. तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडिओ निदर्शनास येताच पोलिसांनी सदर तरुणाचा शोध सुरू केला. त्यात सदर व्यक्ती ही विश्रांतीनगर भागातील गल्ली नंबर २ मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दीपक सरकटे (२३) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना तलवारीने केक कापल्याची कबुली त्याने दिली. काल १ मे रोजी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता.

केक कापल्यानंतर त्याने पलंगाखाली तलवार लपवून ठेवली होती. ही तलवार पोलिसांनी जप्त केली असून दीपक सरकटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, रवि जाधव, दीपक जाधव, अजय कांबळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here