मीरा-भाईंदर पालिकेला ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सोडवून ऑक्सिजन बेडस वाढवण्याची सूचना
मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील तपोवन हायस्कूल, पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल आणि उत्तन- चौक गावातील शाळेतील कोविड केअर सेंटरमधील एकूण ३०० अतिरिक्त बेड्सच्या सुविधेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
याशिवाय शहरातील नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लँटला देखील भेट दिली. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील ३ कोविड केंद्रांमधील वाढीव बेड्सचे लोकार्पण करून या सुविधेची पाहणी केली. तसेच महापालिकेच्या माध्यमातून उभ्या रहात असलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटला देखील त्यांनी भेट दिली. महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णाच्या सुविधेसाठी बेड्स वाढवून देण्यात आले असले तरीही पालिकेच्या अखत्यारीतील १०० आणि खाजगी रुग्णालयातील २०० असे सुमारे ३०० बेड्स ऑक्सिजन अभावी वापरता येत नसल्याचे वास्तव त्यांच्या समोर आले. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर मंजूर केलेले २ ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित करणे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यावर भर देणे आणि ऑक्सिजन कॅन्सट्रेटरच्या माध्यमातून लोकांना तातडीची मदत करण्याचे उपाय आयुक्तांना सुचवले.

त्यासोबतच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा गैरवापर टाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे, शहरातील सर्व रुग्णालयाचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करून घेणे आणि खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन मॉनिटरिंग करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त किंवा वॉर्ड ऑफिसरची नियुक्ती करणे अशा काही सुचनाही केल्या. याशिवाय कोविड केंद्रातील वातावरण चांगलं ठेवण्यासाठी कौन्सिलिंग, योगा, संगीत आशा थेरपीजची मदत घेण्याच सुचवलं. ज्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खाली आली आहे. अशा रुग्णांना पालथं झोपवून ती काही अंशी वाढते का..? यासाठी प्रयत्न करणे, रुग्णांसोबत डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्याचे मनोबल उंचावण्यासाठी जास्त वेळ काम करणार्यांना अतिरिक्त मोबदला देण्याचा विचार करण्याची सूचना देखील पालकमंत्री यांनी केली.

तेथील स्थानिक अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता, महापालिकेचे काही प्रश्न निधीअभावी रखडले असले तरीही नगरविकास विभागाकडून ५ कोटी तर एम.एस.आर.डी.सी कडून अडीच कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. याशिवाय डीपीडिसी आणि एसडीआरएफच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वसन त्यांनी दिले. असं असलं तरीही निधीअभावी कोणतंही काम रखडणार नाही याची दक्षता घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री यांनी या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीला खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, विधान परिषदेतील आमदार रवींद्र फाटक, मीरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.






