मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यातील काही भागांमध्ये आगामी दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. कालच पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. तत्पूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला होता.
सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. साडे चार वाजल्यापासून सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात आजही अवकाळी पाऊस झाला. अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. शेतात शिजवून टाकलेली हळद भिजत असल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यातील गंगाखेड सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गर्मीच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर शेतातील फळबागा, ज्वारी आणि काढणी झालेल्या हळदीचे नुकसान होत आहे.
चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हजेरी लावली. तळेगाव येथे वीज पडून महिला जागीच ठार झाली आहे. ही घटना रविवारी (2 मे) दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी घडली. हिंमत मोरे यांच्या शेतात शेत मशागतीचे काम सुरू होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. पाऊस सुरू झाला. त्याचवेळी झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या वंदना हिंमत मोरे यांच्या अंगावर वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नंधाना, चांडस गावासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. मालेगाव तालुक्यातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला आलेल्या उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग, सोयाबीन या पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.अकोल्यात पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय. रात्रीही जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी आल्या होत्या.
नांदेडमध्ये सांयकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने आंबा, संत्रा, मोसंबी या फळबागांचे मोठे नुकसान झालेय. त्या बरोबर हळद आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे देखील मोठे नुकसान झालेय. आजच्या या पावसाने वाढलेला उकाडा कमी होण्यास मदत झालीय, मात्र शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालेय. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कंबरडे मोडणारी स्थिती निर्माण झालीय.






