कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादर) – जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांत 71 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत 1 हजार 939 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 1 हजार 567 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 69 हजार 914 वर पोहोचली असून, आतापर्यंत 57 हजार 926 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांची एकूण संख्या 2 हजार 328 झाली आहे. अजूनही जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात उपचारासाठी बेडच उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांत 28 महिला आणि 43 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. शहरात 359 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत, तर 11 जणांचा मृत्यू झाला. तालुक्यांचा विचार केल्यास हातकणंगले तालुक्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 12 तालुके आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात 792, शहरात 242, अन्य जिल्ह्यांतील 89 जण, तर रविवारी तालुक्यांत 600, शहरात 177, तर अन्य जिल्ह्यांतील 39 बाधित रुग्ण सापडले आहेत. शनिवारी 787, तर रविवारी 780 जणांनी कोरोनावर मात केली. शासकीय प्रयोगशाळेत शुक्रवारी 2903 जणांची आरटी-पीसीआर तपासणी झाली. यामध्ये 2315 जणांचे अहवाल निगेटिव्ह , तर 516 जणांना संसर्ग झाला. 72 स्वॅब रिपीट होते. अँटिजेनवर तपासलेल्या 1 हजार 184 स्वॅबपैकी 1 हजार 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 179 स्वॅब बाधित आले. यातील 65 स्वॅब आरटी-पीसीआरवर तपासणीसाठी पाठविले आहेत. खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या 397 स्वॅबपैकी 276 स्वॅब निगेटिव्ह, तर 121 जणांचे अहवाल बाधित प्राप्त झाले. शनिवारी शासकीय प्रयोगशाळेत 3 हजार 94 स्वॅब तपासले. त्यात 2 हजार 454 जण निगेटिव्ह आले. 543 जणांना कोरोना संसर्ग झाला, तर 97 जणांचे स्वॅब रिपीट होते.
अँटिजेनवर तपासलेल्या 1 हजार 497 स्वॅब पैकी 1 हजार 267 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 230 जण यात बाधित आढळले असून, 58 जणांचे स्वॅब आरटी-पीसीआरवर तपासणीसाठी पाठविले आहेत. दोन दिवसांत 3 हजार 579 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. बाधितांमध्ये आजरा 74, भुदरगड 64, चंदगड 96, गडहिंग्लज 140, गगनबावडा 24, हातकणंगले 76, कागल 78, करवीर 203, पन्हाळा 100, राधानगरी 35, शाहूवाडी 128, शिरोळ 196, नगरपालिका 147, अन्य जिल्ह्यांतील 167, शहरात 419 नव्या रुग्णांची भर पडली आहे.






