ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह तिघा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची महासंचालकपदी बढती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक असलेले के. वेंकटेशम, संदीप बिश्नोई आणि विवेक फणसळकर या तिघा अधिकाऱ्यांची महासंचालकपदी बढती झाली आहे.
राज्याच्या विशेष कृती अभियानचे प्रमुख असलेले के. वेंकटेशम यांना नागरी संरक्षण दलाच्या संचालकपदी बढतीने पदोन्नती करण्यात आली आहे. तर लोहमार्गचे अपर महासंचालक संदीप बिश्नोई यांच्याकडे राज्याच्या न्यायिक व तांत्रिक विभागाच्या महासंचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून विवेक फणसळकर हे आता राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज पाहतील.
दरम्यान, फणसळकर यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाण्याचे सहपोलीस आयुक्त सुरेश कुमार मेकला यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आला आहे. फणसळकर यांच्या बढतीमुळे रिक्त झालेल्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






