मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्यासाठी चक्क नोटीसा पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबतच ठाणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविण जगदीश खैरालिया यांच्याकडून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तसेच जोशी बेडेकर महाविद्यालयाला फी भरण्याच्या तारीख व अटींमध्ये शिथिलता आणण्यासाठी निवेदन पाठविण्यात आले आहे.
कोरोना कोविड – १९ मुळे मार्चपासून देशात व राज्यात कोरोना संकट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक कामा विना घरी आहेत. रोजगार बुडाल्याने लोकांना दैनंदिन जीवनावश्यक गरजा ही भागवताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशी बिकट परिस्थिती असताना ही व कॉलेजमध्ये शिक्षणाची सुरुवात ही झाली नसताना फी भरण्याची सक्ती करणे हा अन्याय आहे. घरात जेवण्याची अडचण असताना पालकांनी मुलांची शिक्षण फी कुठून भरायची? हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. असे मत निवेदनात व्यक्त केले गेले आहे.
बेडेकर महाविद्यालयाने दिलेल्या नोटीसीमध्ये फी भरण्याची अंतिम तारखेपर्यंत फी नाही भरली तर, विद्यार्थ्यांचे अॅडमिशन रद्द होणार असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाची ही भूमिका विद्यार्थी व कुटुंबियांना ताण वाढवणारी आहे. म्हणून जोशी बेडेकर महाविद्यालयाने फी भरण्याची तारीख आणि अटीमध्ये शिथिलता आणावी. तसेच जिमखाना, ग्रंथालय आणि स्पोट फी सरसकट माफ करावी व फी सुलभ हप्त्यामध्ये भरण्याची मुभा सर्व विद्यार्थ्यांना द्यावी. अशी विनंती पालक आणि प्रविण खैरालिया यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला केली आहे.









