- – मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांची महानगरपालिकेकडे मागणी
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – अनेक पत्रकार पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रस्त्यावर उतरून वार्तांकनाचे काम निर्भीडपणे करत आहेत. अशा पत्रकारांमुळेच वास्तव बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचतात.रस्त्यावर उतरून काम करणारे पत्रकार, कॅमेरामन हे कोरोना योद्धेच आहेत. आपण जाणता कि या कोरोनाच्या महामारीत अनेक पत्रकारांनी कोविड मुळे प्राण गमावले आहेत. तसेच अनेक पत्रकारांचे कुटुंबीय बाधित होऊन त्यांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे नवी मुंबईतील पत्रकार बंधु भगिनींसाठी लसीकरणाची विशेष सोय करावी अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
या कोरोना योद्ध्यांना कोणतेही विशेष सहकार्य सरकारकडून या काळात झाले नाही. सध्या १८ वर्षे पेक्षा जास्त आणि ४५ वर्षे पेक्षा जास्त लोकांना लसीकरण करणे नवी मुंबईत अवघड झाले आहे. ऑनलाईन मध्ये लस नोंदणी काही सेकंदात पूर्ण होते. अशा वेळी या पत्रकारांना लस घेणे अवघड झाले आहे.
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे विनंती केली, कि जसे वकिलांना लसीकरणाची विशेष सोय केली, त्या धर्तीवर नवी मुंबईतील पत्रकारांना आणि कुटुंबियांना सुद्धा लसीकरणासाठी दोन-तीन दिवसांची वेगळी नोंदणी ठेवावी. जेणेकरून रस्त्यावर उतरून काम करणारे पत्रकार सुरक्षित राहतील. इतर काही राज्यांनी सुद्धा पत्रकारांना कोरोना योद्धे म्हणून अशी विशेष सुविधा दिली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त या विषयात गंभीरपणे लक्ष घालून लवकर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली.






