मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ड्रग्ज पेडलरकडे एमडीची मागणी आणि खरेदी केल्या प्रकरणात अभिनेता दलिप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाने अटक केली आहे. एमडी विकत घेऊन ध्रुव स्वतः त्याची नशा करायचा की अजून कोणाला विकायचा याचा पोलीस आता शोध घेत आहेत.
गेल्या 20 एप्रिल रोजी अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने मुज्जमिल अब्दुल रेहमान शेख या ड्रग्ज तस्कराला 35 ग्रॅम एमडीसह रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी पोलिसांनी शेखचा मोबाईल जप्त केला होता. त्या मोबाईलची तपासणी केली असता शेख आणि ध्रुव ताहिल यांच्या ड्रग्जबाबत व्हॉटसऍपवर चॅटिंग झाल्याचे समोर आले.
ध्रुवने अनेकदा एमडी तसेच अन्य ड्रग्जची मागणी केल्याचे चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे. ध्रुवने त्याच्या येस बँकेच्याखात्यातून आरोपी मुज्जमिलच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यात सहा वेळा पैसे ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे. 2019 पासून ते मार्च 2021 पर्यंत ध्रुव हा ड्रग्जची खरेदी करण्यासाठी मुज्जमिलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. ध्रुवला पोलिसांनी अटक केली असून तो ड्रग्ज स्वतःसाठी मागवायचा की ड्रग्ज विकत घेऊन अन्य कोणाला विकायचा याचा आता आम्ही शोध घेत असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.






