पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये!

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पोलिस नागरिकांशी कसे वागतात, हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे चक्क मटणवाला ‘चाचा’ बनून शहरात फिरले. बुधवारी (दि.५) रात्री नियंत्रण कक्षाला कॉल देऊन त्यांनी पोलिसांच्या प्रतिसाद तपासला. विशेष म्हणजे त्यांना कोणीही ओळखले नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पोलिस नागरिकांशी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी विचारणा केली असता आपण असे काही केले नसल्याचा आव आणला जात होत. त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून स्वतःच पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी रात्री कृष्ण प्रकाश वेशांतर करून मटणवाले चाचा बनले होते. त्यासाठी दाढी चिटकवली. डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग देखील चढवला. त्यांच्यासोबत सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यासुध्दा वेशांतर करून होत्या.

सुरुवातीला त्यांनी पिंपरी पोलिस ठाणे गाठले. मी पिंपरी गावातील मटणवाला चाचा असून आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे. मात्र, चालक ८००० रुपये सांगून लुटत आहे, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र, “हे आमचे काम नाही”, असे म्हणून त्यावेळी हजर असलेल्या पोलिसाने त्यांना टोलावून लावले. त्यामुळे चिडलेल्या कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून आपली ओळख सांगितली. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी आणि वाकडच्या हद्दीत जाऊन नियंत्रण कक्षाला कॉल दिले. “आमचा रमजान सुरू आहे. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्यातील काही तरुणांनी माझ्या बायकोची छेड देखील काढली, मला लाथा मारल्या. अशा तक्रारी केल्या. त्यानंतर वाकड आणि हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन गंभीर दखल घेतली. याबाबत गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी आपली ओळख सांगून त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here