कोरोना पार्श्वभूमीवर दिल्लीहून धावणाऱ्या २८ गाड्या ९ मेपासून रद्द

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून तो जोमाने फैलावत आहे. त्यामुळे देशाच्या अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तर देशाची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही बरीच कमी झाली आहे. यादरम्यान, रेल्वे विभागाने दिल्लीहून धावणाऱ्या २८ रेल्वे गाड्या ९ मेपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्या पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. यात राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्सप्रेससह इतर २८ रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या हाहाकाराने महाराष्ट्रासह अनेक राज्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी जात आहेत. तसेच जेथे जेथे कोरोनाचा प्रकोप आहे तेथील रेल्वे वाहतुकीवर रेल्वे विभागाने आधीच मर्यादा आणल्या आहेत. याच्या आधीच विभागाने प्रवाशांच्या कमतरतेमुळे १४ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उत्तर-पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनरल)/ लेफ्टनंट शशी किरण यांनी, पुढील आदेश होईपर्यंत १४ गाड्या रद्द केल्या जात असल्याची माहिती दिली होती. हा आदेश जेथून प्रवास सुरू होणार आहे त्याच स्टेशनपासूनच लागू केला जात आहे.

तसेच रेल्वे विभागाकडून ९ मेपासून दिल्लीहून धावणाऱ्या २८ रेल्वे गाड्या थांबविण्याबरोबरच ६ गाड्यांची (प्रारंभिक स्थानकापासून) फेऱ्या कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच आणखी दोन रेल्वे गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here