चिनी रॉकेट शनिवारी ‘या’ शहरांवर कोसळण्याचा धोका

वॉशिंग्टन – अमेरिकन सरकारने इशारा दिला आहे की चीनचे वजनदार रॉकेट शनिवारी पृथ्वीवर कोसळू शकते. सुमारे 21 टन वजनाचे हे रॉकेट घनदाट लोकसंख्या असलेल्या काही महानगरांवर कोसळण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क, स्पेनमधील माद्रिद आणि चीनमधील बीजिंगचा समावेश आहे. मात्र, हे रॉकेट नेमके कुठे कोसळू शकेल हे वैज्ञानिकांना समजू शकलेले नाही.

अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की शनिवारी हे रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकते. या रॉकेटबाबत सातत्याने सोशल मीडियात पोस्ट करून माहिती दिली जाणार आहे. सॅटेलाईट ट्रेकरनी म्हटले आहे की शंभर फूट लांब आणि 16 फूट रुंदीचे हे रॉकेट 4 मैल प्रतिसेकंद या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या रॉकेटला ‘2021-035 बी’ असे नाव दिले आहे. प्रवक्‍ते माईक हावर्ड यांनी पुढे म्हटले आहे की अमेरिकेचे स्पेस कमांड चीनच्या ‘लाँग मार्च 5 बी’ बाबत पूर्ण माहिती मिळवून तयार आहे व या रॉकेटच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. हे रॉकेट कुठे पडेल याची नेमकी माहिती ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याआधी दिली जाऊ शकत नाही. हे रॉकेट 8 मे रोजी पृथ्वीवर कोसळू शकते.

चीनचे हे 21 टन वजनाचे विशाल रॉकेट अंतराळात अनियंत्रित झाले आहे आणि ते आता पृथ्वीच्या दिशेने येत आहे. जर ते पृथ्वीवरील एखाद्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरावर कोसळले तर मोठीच हानी होऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांनी सांगितले की या रॉकेटचा मार्ग न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंगकडून उत्तरेकडे तसेच दक्षिणेत चिली व न्यूझीलंडच्या दिशेने जातो. या मार्गात ते कुठेही कोसळू शकते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर ते जळून त्याचे तुकडे समुद्रातही कोसळू शकतात. यापूर्वीही चीनच्या ‘मार्च 5 बी’ या रॉकेटचा मुख्य भाग अंतराळात अनियंत्रित झाला होता व तो मे 2020 मध्ये अटलांटिक महासागरात कोसळला होता. तत्पूर्वी, तो अमेरिकेच्या लॉस एंजिल्स आणि न्यूयॉर्क शहरावरून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here