गोव्यात मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी

पणजी (प्रतिनिधी प्रविण म्हापसे) – गोव्यात कोरोनामुळे सद्यस्थीती अत्यंत वाईट आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. देशासह राज्यातही कोरोनाचा कहर शिगेला पोचला आहे. विविध राज्यांनी लॉकडाऊन स्वीकारले आहे. अशा वेळी चित्रपट किंवा मालिका चित्रीकरण करता येत नसल्याने बऱ्याच मालिकांनी चित्रीकरणासाठी गोव्याची निवड केली. मागील काही दिवसात राज्यात चित्रीकरण होत असलेले फोटो व्हिडिओ व्हायरल होत होते. पण याला अनेकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे अखेर राज्य सरकारने मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात विविध ठिकाणी मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. कोरोनाचा उद्रेक वाढला असताना अशा पद्धतीने मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिल्याबद्दल नागरिकांमध्ये रोष पसरत होता.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये सुरु असलेल्या ‘सूर नवा, ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणस्थळी त्यांना चित्रीकरण बंद करण्यास सांगितले. बुधवारी रवींद्र भवनात गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी जाऊन चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यांनंतर सरकारने राज्यातील चित्रीकरणावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. सरकारने सावधगिरी बाळगत आता राज्यात एकूणच चित्रीकरणावर बंदी आणली आहे.

दरम्यान, कोव्हिडच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन राज्यात सुरू असलेलं चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला मुख्य सचिव, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य अधिकारी आणि उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते. गोव्यात आता कुणालाच चित्रीकरणासाठी परवानगी दिली जाणार नाही. परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याचं आढळून आल्यास गंभीर करवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सावंत यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here