ससून रुग्णालयातून ‘रेमडेसिव्हिर’ची चोरी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ससून रुग्णालयाच्या कोव्हिड इमारतीतून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील ५७ वर्षीय परिचारिकेने फिर्याद दिली आहे. ही घटना एक ते तीन मे या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ससून रुग्णालयातील कोव्हिड इमारतीत सेवा बजावत होत्या. त्या वे‌ळी त्यांच्यासोबतच्या औषध मागवणाऱ्या अधिपरिचारिका यांनी एक मे रोजी रुग्णासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवले होते. ते त्यांना त्याच दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास मिळाले, तर फिर्यादीच्या ताब्यात ते दुसऱ्या दिवशी दिले गेले.

त्यांनी ते इंजेक्शन जिथे ठेवले होते, तिथे ते काही वेळाने सापडले नाही. सर्वत्र शोधूनही इंजेक्शन सापडले नाही. तिसऱ्या दिवशी इंजेक्शनचे रिकामे ‘व्हायल’ सापडले. मात्र, भरलेले इंजेक्शन सापडलेच नाही. त्यानुसार त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिश ठाकूर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here