अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – राज्याचे पर्यावरणमंत्री, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी रायगडकरांसाठी 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. या युनिटमुळे कोरोनाने होणारे मृत्यू कमी होण्यास मदत मिळणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी आज (6 मे) हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकरी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात दिवसाला 20 ते 50 लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मोठी मदत होऊ शकते. एका संस्थेने यासाठी सहकार्य केले आहे.
50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पैकी अलिबागला जिल्हा रुग्णालय असल्यामुळे 20, कर्जतला 10, खोपोलीला 10 आणि महाड तालुक्यात 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले आहे. या भागात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या मोठी असल्यामुळे या तालुक्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.






