द्वारका – कोरोनाची दुसरी लाट गुजरातसह संपूर्ण देशात हाहाकार माजवत आहे. यातही सौराष्ट्रमध्ये कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहोचलेला आहे. भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवभूमी द्वारकेतही कोरोनामुळे एका कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय.
द्वारकेतल्या एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झालं, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. द्वारका येथील रहिवासी जयेश भाई जैन नाश्त्याचे दुकान चालवत होते. गुरुवारी रात्री कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
जेव्हा निधनाची बातमी समोर आली, तेव्हा संपूर्ण कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जयेश भाईचा अंत्यसंस्कार करून त्यांची पत्नी साधना बेन आणि दोन मुले कमलेश आणि दुर्गेश जैन यांनीही आत्महत्या केली. या तिघांनीही विष प्राशन करून स्वत: ची जीवनयात्रा संपवल्याचं सांगण्यात येत आहे.






