नाशिक (विशेष प्रतिनिधी) – शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी उमेश नाईक यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या जुन्या घरी गळफास घेऊन नाईक यांनी आत्महत्या (Suicide) केली. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उमेश नाईक आर्थिक विवंचनेत होते. या कारणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवटी पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उमेश नाईक काळाराम परिसरात राहत होते. मात्र, त्यांचे जुने घर नागचौक परिसरात आहे. या घराचे रंगकाम करायचे आहे, असे पत्नीला सांगून उमेश नाईक घराबाहेर पडले होते. बराच वेळ घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना फोन केला. मात्र, उमेश नाईक यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने काहीजण त्यांना शोधण्यासाठी जुन्या घरी गेले.
त्याठिकाणी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. अखेर घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा स्लॅबच्या गजाला लटकून उमेश नाईक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.






