तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार (विजय पाटील) – हतनूर प्रकल्पातील 31 हजार 364 क्युसेक्स पाणी तापी पात्रात सोडण्यात आले असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस असल्याने तासागणिक पाण्याची पातळी वाढत आहे. त्‍यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तापी काठच्या गावांना पुढील 72 तास सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तापी नदीपात्रात पाण्याच्या पातळीत सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. सायंकाळी 7 वाजल्‍यापासून नदी काठावर पूरस्थिती निर्माण होणार आहे. तसेच पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडले असून 31364 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले असून, 37 हजार क्युसेक्स विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीला पूर आल्याने या नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे 6 दरवाजे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून, 35165 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 5 दरवाजे 3 मीटर उंचीने उघडण्यात आले असून, त्‍यातून 45498 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here