पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एकीकडे अवघ्या देशात थैमान घातलेले असताना महाराष्ट्र मात्र या लाटेशी जोरदार लढाई लढत आहे आणि मुकाबला करत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या स्थितीची आणि ती रोखण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती करून घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत. पंतप्रधानांनी आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

दुसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने कठोर उपाययोजना केल्या आहेत. राज्यात कडक निर्बंधही लावले आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ गेल्या काही दिवसांत मंदावली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या सर्व उपाययोजनांची पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली आणि महाराष्ट्राच्या लढाईचे कौतुक केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली. महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी इतर विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱया लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र कशा प्रकारे नियोजन करीत आहे त्याविषयीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली.

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढय़ात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.पंतप्रधानांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्कीमच्या तर त्याआधी आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्याशिवाय जम्मू-कश्मीर आणि पुद्दूचेरीच्या उपराज्यपालांशीही त्यांनी संवाद साधला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here