ठाण्यात लसीकरणाचे स्लॉट राजकारण्यांकडून हॅक?

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – लसीकरणासाठी वेळेचा स्लॉट बुक करण्यासाठी सध्या कोविन आणि आरोग्य सेतू ॲपवर अनेकांची झुंबड उडत आहे; परंतु लसीकरणाचा स्लॉट बुक करण्याची वेळ आली तर काही सेंकदातच त्या दिवसाचे संपूर्ण स्लॉट बुक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा होत आहे. मात्र, दुसरीकडे ठाण्यात काही राजकीय मंडळींची माणसे एकागठ्ठा अशा प्रकारचे स्लॉट बुक करून आपल्या मतांचा जोगवा गोळा करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात हे स्लॉट ओपन होण्यापूर्वी काही मिनिटे आधीच एका पेजवरून संबंधितांना मेसेज जात असल्याने ते तात्काळ बुक होत आहेत. त्यामुळे सामान्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

ट्रेनचे बुकिंग करताना किंवा तत्काळ बुकिंग करताना नागरिकांना ज्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अगदी त्याच पद्धतीने आता लसीकरणाचा स्लॉट बुक करताना अशाच प्रकारच्या समस्येला जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

ठाण्यात लसींचा तुटवडा असला तरी काही केंद्रावर रोजच्या रोज लसीकरण सुरू आहे; परंतु लसीकरणाचा स्लॉट बुक करताना नागरिकांना एकतर बुकिंगच्या वेळेस अपेक्षित असलेला ओटीपी वेळेत मिळत नाही किंवा मिळालाच तर अगदी काही सेकंदांत ९०० लोकांचा स्लॉटदेखील बुक झालेला असतो. त्यामुळे काही जण तर स्लॉट बुकिंग करण्यासाठी दिवसभर मोबाइलवर असतात. आता स्लॉट पडेल नंतर स्लॉट पडेल या आशेवर असतात; परंतु या त्यांच्या आशा फोल ठरत आहेत. कारण ते ज्या वेळेस बुकिंग करायला जात आहेत, त्याच वेळेस हॅकिंगमुळे बुकिंग फुल असल्याचे दाखविले जात आहे.

ठाण्यात काही राजकीय मंडळींच्या कार्यालयात काम करणाऱ्या मुलांना सध्या स्लॉट बुकिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. ही मंडळी आपल्या परिसरातील नागरिकांचे आधार कार्ड घेऊन, त्याद्वारे आपल्या मोबाइलद्वारे ॲपवर रजिस्ट्रेशन करून घेत आहेत. एक व्यक्ती या ॲपवर चार जणांचे रजिस्ट्रेशन करून एकाच वेळेस चार जणांचा स्लॉट बुक करू शकतो. अशाच पद्धतीने एका एका राजकीय नेत्याकडे ८ ते १० किंवा २० जणांची टीम कार्यरत असल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांच्या माध्यमातून बुकिंगचा स्लॉट अगदी काही क्षणात बुक केला जात आहे. त्यामुळे जे प्रामाणिकपणे बुकिंगसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांची निराशा होत आहे.

ठाण्यातील काही ॲप विकसित करणाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यातून आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रेल्वे बुकिंग प्रमाणेच या ॲपमध्येदेखील स्थानिक पातळीवर छेडछाड करण्यात आली असून स्लॉट बुकिंगसाठी आणखी एक ॲप विकसित केला असावा, असा दावा करण्यात आला आहे. त्यातही काही मंडळींकडे ठाण्यासाठी इन्स्टाग्रामची एक लिंकही गेली आहे, ज्या लिंकद्वारे स्लॉट बुकिंगच्या २ ते ३ मिनिटे आधी स्लॉट बुकिंग सुरू होणार याचा मेसेज जात आहे. त्यानुसार तत्काळ ही मंडळी स्लॉटचे ग्रुप बुकिंग करीत असल्याची माहिती उघड झाली आहे.त्याच वेळेस सर्वसामान्य नागरिक आपल्या मोबाइलवर ओटीपी येण्याची वाट बघत असतात. याचाच अर्थ सर्वसामान्यांना ओटीपी मिळत नाही, मात्र, हा ओटीपी राजकीय पक्षाच्या मंडळींना सहजपणे उपलब्ध होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here