मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने मोठय़ा प्रमाणावर लसीकरणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. पण लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करताना प्रचंड ताण पडतो आणि ॲप ‘क्रॅश’ होते. त्यामुळे लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आपल्या नेतृत्वाखाली कोविड महामारीच्या विरोधात संपूर्ण देश लढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या विरोधात लढताना आपले मार्गदर्शन व सल्ला मोलाचा ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रात आवर्जून नमूद केले आहे.
केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यांत लसींचा पुरवठा वेळोवेळी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाची मोहीम अतिशय वेगाने व अतिशय प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात 18 ते 44 या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची योजना सुरू आहे. या लसीकरणासाठी कोविन ॲपवर प्रत्येकाला नोंदणी बंधनकारक केली आहे. या वयोगटातील लोकांची लसीकरणासाठी एकाच वेळेस नोंदणी सुरू झाल्यामुळे कोविन ॲप क्रॅश होते किंवा त्यात बिघाड होतो. त्यामुळे लसीकरणाच्या नोंदणीसाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्याची केंद्राने महाराष्ट्राला परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. केंद्राने प्रत्येक राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची मुभा द्यावी. या ॲपवरील डेटा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला जाईल, अशी सूचनाही यामध्ये केली आहे.
कोविडच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. म्हणून 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण वेगात व प्रभावीपणे आणि लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या दोन सूचनांचा विचार करावा, अशी विनंती पत्राच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.






