हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे नवे मुख्यमंत्री, सोमवारी शपथविधी

गुवाहाटी (आसाम) – आसाममध्ये नुकत्याच झालेल्या विभानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या विजयानंतर सर्बानंद सोनोवाल की हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. उद्या (10 मे) सोमवारी सकाळी 12 वाजता मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी होईल.

रविवारी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पक्षाचे महासचिव अरुण सिंह आणि भाजपचे आसाम राज्याचे प्रभारी बैजयंत पांडा हे सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावरून भाजपमध्ये संभ्रम होता. सर्बानंद सोनोवाल हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की हिमंत बिस्वा सरमा यांच्या खांद्यावर आसामचा भार सोपवला जाणार यावर एकमत नव्हते. अखेर गेल्या शनिवारी पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सरमा आणि सोनोवाल यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यानंतर आज हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, आसाममध्ये तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले आणि 75 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे आसाममध्ये गेल्या 70 वर्षात एकाही पक्षाला सलग सत्ता मिळवता आली नव्हती. मात्र भाजपने पुन्हा सत्ता मिळवत इतिहास रचला.

दरम्यान, हिमंत बिस्वा सरमा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. परंतु 2016 मध्ये विजय मिळवल्यावर भाजपने सर्बानंद सोनोवाल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोनोवाल यांनी काँग्रेसच्या राजिब लोचन पेगू यांचा 43 हजार 192 मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. तर हिमंत बिस्वा सरमा यांना काँग्रेसचे रोमेन चंद्र बोरठाकूर यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here