तळेगाव दाभाडे येथील ग्रामीण रुग्णालयातील घटना
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – तळेगाव दाभाडे येथील भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयामध्ये (जनरल हॉस्पिटल) कोविड आयसीयू वॉर्डात उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णाने स्टोअर रूममध्ये वायरच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. आठ दिवसांपूर्वी तळेगाव हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गणेश लोके यांचा करोनाने मृत्यू झाला. त्यानंतर बिलाचा भरल्याचा मुद्दा राज्यभर गाजला. हे प्रकरण ताजे असताना रविवारी (दि. 9) सकाळी करोनाच्या रुग्णाने आत्महत्या केल्याने या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली.
सोमनाथ तुकाराम हुलावळे (वय 44, रा. कार्ला ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या करोना रुग्णाचे नाव आहे. या प्रकरणी फिर्याद दिनेश हनुमंत हुलावळे (वय 33) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हुलावळे यांच्यावर शनिवारपासून (दि. 1) जनरल हॉस्पिटलमधील कोविड ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू होते. अचानक रविवारी (दि. 9) सकाळी टेलिफोन केबलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उजेडात आली.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, कर्मचारी बाबराजे मुंडे, स्वप्नील चांदेकर आदींनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वामन गेंगजे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. अंत्यसंस्कार बनेश्वर स्मशानभूमीत करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर करीत आहेत.






